Register     Login    

पुस्तकाचे परिणाम – सॉली गॅनोर

पुस्तकाचे परिणाम – सॉली गॅनोर
‘’जेथे पुस्तके जाळली जातात तेथे अखेर माणसेही जाळली जातात ‘’- हेन्रिक हेन

सॉली गॅनोर हा लिथुनियातला ज्यू. हिटलरच्या सैन्याने लिथुनिया व्यापला तेव्हा तो दहा वर्षांचा होता.नाझी अंमल जसा प्रस्थापित झाला तसे लिथुनियन जनतेने देखील ज्यूंवर हल्ले चढवले. पुढे जर्मन छळछावणीत सॉली गॅनोरचे बहुतेक मित्र व नातेवाईक मारले गेले पण तो वाचला. त्याची कहाणी अशा प्रसंगातून गेलेल्या इतर ज्यूं पेक्षा वेगळी नाही. Light One candle हे त्याच्या आठवणींचे पुस्तक.त्यातले त्याचे शिक्षक व सॉलच्या वाचनप्रेमासंबंधीचे प्रकरण हृदयस्पर्शी आहे. त्याचे काहीसे स्वैर भाषांतर.

१९४१ च्या अखेरीस रशियाच्या जीवघेण्या थंडीपुढे जर्मन सेनेची माघार सुरू झाली होती,अर्थात अजून बरेच युद्ध शिल्लक होते आणि ज्यूंचा प्रश्न सोडवणे बाकी होते. त्यासाठी भरलेल्या वॉनसी परिषदेत जर्मनव्याप्त प्रदेशांतील ज्यूंना रशियात रस्ते बांधायच्या कामाला जुंपून संपवून टाकण्याची कल्पना हैड्रीचने मांडली.आता फारच थोड्या ज्यूंना आपल्या भवितव्याची काही आशा राहिली होती.
दरम्यान जिवंत रहायचे असेल तर काहीही करून जर्मनांच्या उपयोगी पडण्याच्या स्थितीत असणे हेच ज्यूंना आवश्यक होते. त्यासाठी आमच्या वस्तीतल्या नागरी समित्यांनी व ज्यू पोलिसांनी आम्हा मुलांसाठी सुतारकाम,लोहारकाम शिकवण्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.जेणेकरून त्या कामांसाठी आम्हा मुलांना जर्मन सैनिक जिवंत ठेवतील.ज्यू युवक संघटनांसाठी देखील हे प्रशिक्षणवर्ग म्हणजे चांगले आवरण होते.
६ फेब्रुवारीला आमच्यापैकी बऱ्याच जणांना रिगा येथील छावणीत हलवण्यात आले.आणि नंतर पुस्तकांच्या जप्तीचा आदेश आला. वस्तीतल्या सर्वांनी आपापल्या घरातील सर्व ग्रंथ जर्मन अधिकाऱ्यांकडे ठराविक मुदतीत जमा करायचे होते. त्या नंतर कोणाकडे पुस्तके सापडल्यास त्याला गोळी घालण्यात येणार होती. अनेक शतकांपासून आमची ओळख ही पुस्तकाची ( ओल्ड टेस्तामेंट ) ची माणसे ही होती.कोणत्याही पुस्तकाशी फारकत घेणे हे यातनादायी होते.
वर्षाच्या सुरुवातीस आमच्या घराजवळच्या अनेकांना हलवण्यात आले होते. वस्तीचा तो भाग बेवारस पडला होता. त्यात प्रवेश न करण्याची सक्त ताकीदही होती. पण मी व माझा मित्र कुकी तेथे चोरून प्रवेश करत असू.जळाऊ लाकडांसाठी. इतरही काही फेकलेले पण उपयोगी सामान आम्ही शोधत असू. हे धोकादायक होते. पण धोका पत्करल्याशिवाय जिवंत रहाणे शक्य नव्हते. तिथे बऱ्याचदा चकरा मारल्यावर आमच्या हाती घबाडच लागले. अशाच एका बेवारस खोलीत एक कपाट सापडले आणि त्यात जुनी पुस्तके होती. छताजवळ असलेल्या फटीतूनच तेथे प्रवेश करता येई .ती लपण्यासाठी सर्वोत्तम जागा होती . याला ऑपरेशन लायब्ररी असे नाव आम्ही देऊन टाकले. क्षणभर वाटले की यातली काही पुस्तके नेऊन आपल्या घरच्या कपाटात ठेवावी.एकदा कुकीने तसे म्हटले देखील.पण अखेर त्यालाही धीर झाला नाही कारण आदेशच तसा होता आणि सर्वांनी आपापल्या घराची मौल्यवान पुस्तके जर्मनांकडे जमा करायला सुरुवात केली होती.
पुस्तके जमा करण्याच्या अंतिम दिनाच्या आदल्या रात्री खूप बर्फ पडला. पहाटे पाहिले तर सर्व वस्ती बर्फाच्या दुलईत लपेटली होती. पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्या आईने तिची सर्व आवडती पुस्तके बर्फावरच्या घसरगाडीत , स्लेजमध्ये भरली. शेवटचा गठ्ठा रशियातल्या सर्वोत्तम लेखकांचा होता. ते दहा खंड होते . चामडी बांधणीतले. लाल रंगाची कव्हरे व शीर्षके सोनेरी अक्षरांची. तोल्स्तोय ,लर्मोटोव्ह ,दोस्तोव्हस्की ,तुर्गनेव्ह,पुश्किन, गोगोल .. उत्कटता , विचार, आदर्श ,भावना.. हे खंड आईच्या विवाहात भेट म्हणून आलेहोते. जोचिलकडून. तिचा भाऊ.
मला आईबद्दल सहानुभूती वाटली.वडिलांच्या नाहीश्या होण्यातून ती सावरू शकली नाही. नंतर तिच्या भावाची पाठवणी रिगा छावणीत करण्यात आली. तो कदाचित परत कधीच दिसणार नव्हता.आजकाल आई क्वचितच हसे. दु:ख विसरण्यासाठी ती पुस्तकात डोके खुपसून बसे. माझ्यासारखी. तिची दोन बोटे हातातल्या पुस्तकाची पाने उलटत. खाण्यापिण्याचीही तिला शुद्ध नसे. वाचताना तिच्या लेखी इतर जग अस्तित्वातच नसे. आता जर्मनांना तिची पुस्तकेदेखील हवी होती.
मला तिला सांगावेसे वाटले ,’’ तुला हवी तर राहू देत पुस्तके आपल्याजवळ .नाही तरी आपण मारले जाणारच आहोत. तोपर्यंत तरी वाचता येतील.’’ पण मी गप्प बसलो.आधीच तिला या नवीन वास्तवाशी जुळवून घेणे अवघड झाले होते. ‘’हे पाहा, जर्मन केंद्रापर्यंत ही पुस्तके पोचली पाहिजेत ! ‘’ आईने खड्या आवाजात फर्मान सोडले. तिला माझ्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आला असावा.पुढे ती म्हणाली,’’ पुस्तकापायी जीव जाणे आपल्याला परवडणारे नाही.’’
मी स्लेज खेचत निघालो तसा कुकी मला वळणावर भेटला. त्याने देखील स्लेजवरून पुस्तके आणली होती.तो भांबावलेला वाटला. ‘’चल’’मी करड्या आवाजात म्हटले. त्याला माझी कल्पना फारशी पसंत नसावी पण तो माझ्या मागे येईल याची मला खात्री होती.आम्ही रस्ता ओलांडला व त्या ओसाड पडलेल्या भागात आलो. अर्ध्या तासात आम्ही सर्व पुस्तके आम्हाला सापडलेल्या बेवारस खोलीतल्या कपाटात भरून टाकली. काही शेजाऱ्यांकडे स्लेज नव्हते. त्यांनी देखील आम्हाला पुस्तके वाहून नेण्यासाठी दिली. ती सर्व त्या कपाटात नेऊन ठेवली..
पण माझे समाधान एवढ्याने झाले नाही. माझ्याकडे एक नवीन कल्पना होती. तिला कुकीकडून या वेळेस जास्तच विरोध झाला.पण शेवटी तो नरम पडला. आम्ही दोघांनी जर्मन केंद्रावर वर्गीकरणाचे काम मिळवले. ग्रोडनिक नावाच्या माणसाकडे ती जबाबदारी होते. तो माझ्या वडिलांचा मित्र होता.त्याने आनंदाने केंद्राच्या पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पुस्तके नेण्याचे काम आम्हाला दिले.दुसऱ्या दिवशी कुकी आजारी असल्याच्या बहाण्याने आला नाही.वास्तविक तो इमारतीच्या मागच्या बाजूला उभा होता. मी पुस्तकांचे दोन हातात दोन गठ्ठे घेई व त्यातला एक जिन्यामधल्या खिडकीतून कुकी जेथे उभा होता तेथे टाके व कुकी त्याची पुढे त्या बेवारस इमारतीत व्यवस्था लावे.अश्या बऱ्याच फेऱ्या झाल्या.
हे करण्यात धोका होताच.कमालीची थंडी असताना मी घामाने निथळत होतो. दोन-तीन दिवसांनी कुकीला जर्मन सैनिकाने हटकले तेव्हा त्याने आम्ही ठरवून ठेवलेले उत्तर दिले. तो म्हणाला,’’माझ्याकडे पुस्तके पोचवण्याचे काम आहे त्यासाठी या इमारतीचा दरवाजा शोधतो आहे ‘’ जर्मन सैनिकाने त्याच्यावर विश्वास ठेवला पण त्याच्या मूर्खपणाबद्दल त्याला एक सणसणीत लाथ घातली. कुकीची पँट पार ओली झाली.यानंतर मात्र कुकीने सहकार्य करायचे नाकारलेच.पण तोपर्यंत आम्ही बरीच पुस्तके त्या ओसाड जागेत गोळा केली होती..वस्तीतल्या अनेक ज्यूंना आमच्या उद्योगाची कल्पना होती.ते आम्हाला पाहात होते व दुर्लक्ष करत होते.अशी सुमारे पाचशे पुस्तके आम्ही जमवली. त्यातली सगळीच सोपी व आमच्या वयाच्या मुलांसाठी नव्हती. पण त्यातली बरीच आम्ही वाचली व शाळेतल्यापेक्षा कितीतरी जास्तीचे ज्ञान आम्हाला झाले.
त्या ओसाड जागेतल्या संग्रहातून मी एका वेळेस एकच पुस्तक घरी आणे,गुपचूप वाचे व लपवून ठेवे. अश्याने माझे मन मला खाऊ लागले.उत्तम साहित्याचा संग्रह मी व कुकी केवळ आमच्या स्वार्थासाठी वापरत होतो. हळूहळू आम्ही जवळच्या मित्रांना व नातेवाईकांना देऊ लागलो.नंतर त्यात अनेकजण आले व बातमी पसरू लागली.
मी व कुकी सुतारकाम शिकण्यासाठी जाऊ लागलो. तेथे एल्देस्ताईन हा आमचा गुरु होता.युद्धाच्या आधी तो गणित शिकवे.आता देखील आम्ही खिळे ठोकत नसू तेव्हा तो आम्हाला गणित शिकवे.एकदिवस तो माझ्या जवळ आला आणि मला त्याने थेट विचारले ,’’ काही पाठ्यपुस्तके हवी आहेत .विशेषतः गणिताची.मिळतील का ?’’ मी अशी काही पुस्तके मजजवळ असल्याचेच नाकारले.पण त्याने आपला आग्रह सोडला नाही.शेवटी मी पहातो असे सांगून सुटका करून घेतली.
खरे तर कुकीने मला शाळेची पाठ्यपुस्तके ठेवल्याबद्दल दोष दिला होता.त्यातही गणिताची पुस्तके ठेवायची म्हटल्यावर त्याने मला शिव्याच घालायचे बाकी ठेवले होते.त्याचे गणिताशी वैरच होते.गणिताची पुस्तके पाहून कुकी माझ्यावर ओरडलाच –‘’या पुस्तकांसाठी मी जीव धोक्यात घालू ?’’त्यातलेच एक थोडे नवीन वाटणारे भूमितीचे पुस्तक मी एक दिवस आमचा शिक्षक एल्देस्ताईनसाठी लपवून आणले. ते त्याने पाहिले मात्र आणि मला मिठीच मारली व हर्षभराने म्हणाला ,’’अरे ,हा खजिना आहे ! पाहिलेस का तू? हे हिब्रूत आहे व तेल अव्हीव्ह मध्ये छापलेले ! थोड्याच वर्षांपूर्वी. कोठे मिळाले तुला हे ?’’
एल्देस्ताईन हा लाजरा मनुष्य होता.त्याला टक्कल पडत चालले होते. या वस्तीत जर्मनांनी त्याची पाठवणी करण्याआधी कोनास गावात तो हायस्कूलमध्ये शिकवे.काही लिथुनियन लोकांनी गावातल्या ज्यूंना त्यांच्या सिनेगॉगमध्ये जाळून मारले होते.त्यात एल्देस्ताईनचे कुटुंबही होते.हे सर्व भोगल्यानंतरही त्याची उदात्त विचारांवरची श्रद्धा ढळली नव्हती.मांगल्याचा शेवटी विजय होईल याची खात्री होती त्याला .वस्तीत त्याचे कुणी नातेवाईकही नव्हते. ज्या कुटुंबात पुरुष माणूस नव्हता अशा एका ज्यू कुटुंबाने त्याला दत्तक घेतले होते.एकाकी असलेले मूल , वयस्क वा स्त्री यांच्या संरक्षणासाठी वस्तीतल्या ज्यू समितीनेच ही योजना केली होती.जर्मनांची त्याला मान्यता होती.अशा जोडाजोडीतून अनेक नवीन कुटुंबे या वस्तीत उदयाला आली होती. एल्देस्ताईन अशाच एका पाच जणांच्या कुटुंबाबरोबर राहात होता.त्या कुटुंबात जुळी मुले होते त्यांचा त्याला लळा होता.जर्मनांच्या हाताखाली काम करणाऱ्या लिथुनियन गार्डना लाच देऊन तो आपल्या या जोडलेल्या कुटुंबासाठी थोडे जास्तीचे अन्न मिळवे .त्या दिवशी देखील मी जसे त्याला पुस्तक दिले तसे त्याने ते आपल्या कपड्यांनी भरलेल्या बॅगेत ठेवले.प्रशिक्षण वर्ग संपताच आम्ही दोघेही बाहेर पडलो व तो गेटजवळ लिथुनियन गार्डबरोबर त्याच्या नेहमीच्या देवघेवीसाठी थांबला.मी पुढे निघालो.अचानक मला गार्डचा आरडाओरडा ऐकू आला. तो दारूच्या नशेत होता. एल्देस्ताईनला नेहमीपेक्षा थोडे जास्त अन्न हवे होते.अचानक लिथुनियन गार्ड ओरडला ,’’ त्या तुझ्या बॅगेत काय आहे ? पुस्तक ! ते पण हिब्रू भाषेतले ? पुस्तक बाळगण्याबद्दल मी तुला गोळी घालू शकतो ! तू जी मला बक्षीसे दिलीस त्याबद्दल बंदुकीची गोळी खाणे कसे वाटेल तुला ?’’
मी फक्त दहा यार्ड लांब गेलो होतो.आरडाओरडा ऐकू आला तसे मी वळून पाहिले.जर्मन कार दुसऱ्या दिशेने घटना स्थळी येत होती.ती थांबली. काय चालले आहे ते पाहण्यासाठी नाझी अधिकारी त्यातून उतरला.माझ्या पोटात गोळा आला.
लिथुनियन गार्ड नाझी अधिकाऱ्याला पुस्तक दाखवत असताना एल्देस्ताईन मान खाली घालून उभा होता.नाझी अधिकाऱ्याने पुस्तक चाळले. एल्देस्ताईनला ते कोठून आणल्याचे त्याने विचारले. एल्देस्ताईनचे उत्तर मला ऐकू आले नाही,पण त्या अधिकाऱ्याने माझ्या शिक्षकाच्या थोबाडात मारल्या व ओरडला ,’’खोटे बोलू नकोस.हे पुस्तक पॅलेस्टाईनमध्ये छापले आहे. ही सांकेतिक भाषा आहे ! बोल तुझा येथला माणूस कोण आहे ?कोणी दिले तुला हे ? सांगतोस का गोळी घालू ?’’ मग दोघांनी मिळून एल्देस्ताईनला मारायला सुरुवात केली. मी भीतीने गोठून गेलो.मला वाटले एल्देस्ताईन कुठल्याही क्षणी माझ्याकडे बोट दाखवेल .पण त्याने पडता पडता मला पळून जाण्याची खूण केली.मी जीव घेऊन पळत सुटलो आणि कोपऱ्यावर गोळी झाडल्याचा आवाज ऐकला.मी वळून पाहिले तेव्हा एल्देस्ताईन कोसळत होता.नाझी अधिकाऱ्याने आता पिस्तूल त्याच्या डोक्याला लावले व परत चाप ओढला तशी एल्देस्ताईन जमिनीवर पडला व निपचित झाला.
त्या रात्री मला भयंकर स्वप्न पडले .मी किंचाळत उठलो.पण किंकाळ्या मनांतल्या मनात होत्या.मला धाप लागलेली होती.ज्या वस्तुस्थितीने मला भानावर आणले ती काही फारशी स्पृहणीय नव्हती.माझ्या चुकीमुळे माझा शिक्षक मारला गेला होता.
मी प्रशिक्षण केंद्रावर गेलो नाही. दिवसभर रडत होतो. शेवटी कुकी आला व त्याने माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्या पलीकडे गेलो होतो.मी आणि माझी येडचाप पुस्तके !माझ्या मूर्खपणाने मी अनेकांचा जीव धोक्यात आणल्याची मला पहिल्यानेच जाणीव झाली. माझ्या आईचे म्हणणे बरोबर होते.पुस्तकांसाठी जीव धोक्यात घालणे मूर्खपणाचेच होते.मी तिचे ऐकले नाही आणि एल्देस्ताईन मेला.त्याने केवळ माझ्याकडे बोट दाखवण्याची गरज होती ज्याने कदाचित तो वाचला असता.त्याची मला पळून जाण्याची खूण करणारी दुबळी आकृती आजही दिसते.
’’मूर्ख आहेस.तुला काय वाटते ,त्याने तुझे नाव सांगितले असते तर जर्मन सैनिकाने त्याला जिवंत सोडले असते ? मूर्खा ,त्याने तुम्हा दोघांना गोळ्या घातल्या असत्या आणि हे एल्देस्ताईनला माहीत होते.’’कुकीने माझी समजूत काढली.’’शिवाय त्याने काळजीपूर्वक रहायला हवे होते.’’तो पुढे म्हणाला .पण आता कितीही युक्तिवाद केला तरी एल्देस्ताईन परत येणार नव्हता.
एल्देस्ताईनचे वस्तीतल्या दफनभूमीत दफन झाले.त्याला जिथे मारण्यात आले होते त्याच्या जवळच ही जागा होती.तो ज्या कुटुंबाबरोबर रहात होता ते,त्याचे थोडे विद्यार्थी ज्यात मी व कुकी होतो असे थोडेच लोक या प्रसंगी उपस्थित होतो.त्याला नातेवाईक तर नव्हतेच आणि असले मरण ही या वस्तीत दुर्मिळ गोष्ट नव्हती.इतर कोणीही याकडे लक्ष दिले नाही.कुठलेही धार्मिक विधी झाले नाहीत.जर्मनांची त्याला बंदीच होती.त्याला खड्ड्यात सरकवताना ज्या मुलांबरोबर तो खोलीत राही ती मुले रडत होती.मी व कुकी शुंभासारखे स्तब्ध उभे होतो. मग पाऊस आला तसे आसऱ्यासाठी आम्ही पळालो.
नंतरचे दहा दिवस मी शाळेत गेलो नाही .मुलांना तोंड दाखवण्याची मला लाज वाटत होती.त्या ऐवजी मी एका आजारी कामगाराच्या ऐवजी बदली कामगार म्हणून दहा दिवस गेलो.मी अजून १४ वर्षांचाही नव्हतो.दहाव्या दिवशी मला उभे रहाणे देखील अशक्य झाले.मी कसेबसे स्वत:ला ओढत आणले व वस्तीच्या दाराशी कोसळलो.
ते दहा दिवस जणू माझ्या पापक्षालनाचे होते.दहा दिवस काम करून ढासळलेली माझी तब्येत पूर्वपदावर येईपर्यंत एक महिना गेला .नंतर मी प्रशिक्षण वर्गात गेलो तर आश्चर्य म्हणजे सगळे वातावरण नॉर्मल होते. एल्देस्ताईनच्या मृत्यूचा व मी त्याला दिलेल्या पुस्तकाचा संबंध कोणीही लावला नव्हता.तो इतर अनेकांप्रमाणे लाच देताना पकडला गेला व मारला गेला.
दुसरे आश्चर्य म्हणजे कुकी नेमाने आमच्या त्या ओसाड भागातल्या वाचनालयात जातच होता.त्याने एल्देस्ताईनला मारताना प्रत्यक्ष पाहिले नसल्यामुळे असावे कदाचित वा मी जसा घाबरलो तसे त्याच्याकडे धैर्य आले म्हणा – तो माझ्यासाठी एकदोन पुस्तके घेऊन येई .महिन्याभराने मी त्याच्याबरोबर परत त्या आमच्या छुप्या वाचनालयात जाऊ लागलो.त्या भीषण जगात लोकांचा परमेश्वरावरचा व समाजावरचा विश्वास उडून गेला होता.खरे तर त्यांचा मानवावरचा विश्वासच नाहीसा झाला होता. फक्त पुस्तकांनी मला आधार दिला.एक दिवस अचानक आई कामावरून लवकर घरी आली व तिने मला पुस्तक वाचताना रंगेहाथ पकडले.ती त्याने एवढी अस्वस्थ झाली की मीच घरी पुस्तक न आणण्याची शपथ घेतली.
आता कुकी व माझा वेळ बराचसा त्या ओसाड जागेतल्या पुस्तकांच्या कपाटासोबत जाऊ लागला.एक दिवस कुकीने कपाटातून बायबल काढले .मी ते का तेथे आणले होते हे मलाच ठाऊक नव्हते .मी नास्तिक संस्कारात वाढलो होतो.कदाचित मला वाटले असावे ज्यूंची लायब्ररी ती बायबलशिवाय अपूर्ण राहील.
‘’मला वाटते आपण एल्देस्ताईनसाठी प्रार्थना म्हटली पाहिजे.’’ कुकी म्हणाला .मी चमकून त्याच्याकडे पाहिले.आमच्या बोलण्यात जेव्हा जेव्हा धर्माचा विषय निघे तेव्हा कुकी तो उडवूनच लावे.तोही माझ्यासारखाच अधार्मिक वातावरणात वाढला होता.
’’मला माहीत आहे तू कसला विचार करतो आहेस. एल्देस्ताईन आपल्या पुस्तकामुळे मेला हे खरेच आहे.कदाचित त्याची इच्छा असेल की आपण त्याच्यासाठी प्रार्थना करावी.’’हे ऐकताच मी मुकाटपणे प्रार्थनेच्या ओळी कागदावर लिहून घेतल्या.दुसऱ्या दिवशी शाळेतून येताना आम्ही एल्देस्ताईनच्या दफनस्थळाशी थांबलो व प्रार्थना म्हटली.आश्चर्य म्हणजे माझे मलाच बरे वाटू लागले.रोज शाळेतून येताना मी त्या जागेची काळजी घेऊ लागलो.हवामान उबदार झाले तशी मी तिथे वाटाणे पेरले.त्याचे झाड आले व त्याला वाटाणेही लागले जे मी व कुकीने वाटून घेतले.मला माहीत होते की एल्देस्ताईनची यास काहीच हरकत नसणार.
(From‘Light one Candle)
-रवींद्र कुलकर्णी
kravindrar@gmail.com

  • 0
  • Posted By : Admin

Login to Comment