Register     Login    

पुन्हा एकदा


तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
अंगावर ये तोच धुमारा पुन्हा एकदा

आठवांतले कुठे मिळावे तिचे गाव ते
कोण मांडतो जुना पसारा पुन्हा एकदा

जेमतेम तो करारनामा पुरा वाचला
तोच वाजला तोच नगारा पुन्हा एकदा

केस मोकळे नकोच सोडू सखे आज तू
वाट पाहतो उनाड वारा पुन्हा एकदा

पाहण्या तुझे नीलम-पाचू,मेघ दाटले
करी नर्तना,ढाळ पिसारा पुन्हा एकदा

नाव-गावही वाहुन गेल्यावरी आज हे
कोण शोधते तुझा किनारा पुन्हा एकदा

***************************

( दोन स्फुट द्विपदी :

तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
गोड आठवे घडला होता गुन्हा एकदा

रोज तापसी दुपार होता अरे शापिता
सावलीत ये बैस जरासा उन्हा एकदा )

--SATISH WAGHMARE

  • 0
  • Posted By : Admin

Login to Comment